खर्गे, सोनिया, राहुल गांधी काँग्रेसचे स्टार प्रचारक   

नवी दिल्ली : हरयाना विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी-वढेरा, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी सेलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांचा समावेश आहे. हरयाना विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑटोबर रोजी मतदान होणार आहे. तर, ८ ऑटोबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.
 
स्टार प्रचारांमध्ये विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्या नावाचा समावेश आहे. या दोघांनी भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते. विनेश आणि बजरंग यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. इतर प्रमुख प्रचारकांमध्ये हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, हरयानातील पक्षाचे प्रभारी दीपक बाबरिया, प्रदेशाध्यक्ष उदय भान, राष्ट्रीय सरचिटणीस अजय माकन, सिरसाच्या खासदार कुमारी सेलजा, माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, राजस्तानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार चरणजीत सिंह चन्नी, राजस्तानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचाही समावेश आहे.

Related Articles